नागपूरमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत नितीन शिमले गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरात रविवारी रात्रीच्या शांततेत अचानक शस्त्रांच्या खणखणाटाने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान याने नितीन शिमले यांच्यावर धारदार शस्त्राने एकामागून एक वार केले. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.
धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोर आणि जखमी हे एकेकाळचे जिवलग मित्र होते. जुन्या हत्येच्या एका प्रकरणात नितीन शिमले आणि महेश ठाकरे (सोनूचा साथीदार) हे दोघेही सहआरोपी होते. मात्र, काळाच्या ओघात मैत्रीत मिठाचा खडा पडला. पैशाच्या व्यवहारावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. या वादाने अखेर रविवारी रात्री हिंसक वळण घेतले आणि जुन्या मैत्रीचा अंत रक्ताच्या थारोळ्यात झाला.
शिमले यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. आरोपी सोनू ठाकरे हा घटनेनंतर लागलीच फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत. "गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही," अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली आहे.जुनी शुक्रवारी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.