नाशिक : अजित दादांच्या निधनानंतर घाणेरडं राजकारण, 'या' नगरसेविकेने घेतला मोठा निर्णय
नाशिक : अजित दादांच्या निधनानंतर घाणेरडं राजकारण, 'या' नगरसेविकेने घेतला मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात गटनेतापदावरून तीव्र अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेविका; तथा पक्षप्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी गटनेतापदावर दावा केलेला असतानाच पक्षाकडून सीमा रंजन ठाकरे यांच्या नावाचे नियुक्तीपत्र आल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे.

नाशिक महापालिकेत अजित पवार गटाचे गटनेतेपद आपल्यालाच मिळेल, अशी डाॅ. हेमलता पाटील यांना आशा होती. २४ जानेवारी रोजी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत अजित पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या आधारावर तुम्हालाच गटनेता म्हणून काम करावे लागेल, असे सांगितले होते, असे डाॅ. हेमलता पाटील यांचे म्हणणे आहे.

दरम्यान डॉ. हेमलता पाटील यांनी गटनेते पदाबाबत पक्षाने निर्णय घेतल्याचे सांगत, विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र सदस्य नोंदणी केली आहे. सीमा ठाकरे यांना गटनेता करण्यात आल्याने डाॅ. पाटील यांनी नाराजी कायम ठेवत विभागीय आयुक्तांकडे आपली स्वतंत्र सदस्य नोंदणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना सोबत घेऊन चार सदस्यांचा गट स्थापन केला आहे. डॉ. पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र सदस्य नोंदणी केल्याने पक्षावर त्यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु, पक्षाने डॉ. पाटील यांच्याऐवजी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे यांना गटनेतेपद दिले आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांनी मला नाशिक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता करण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यांच्या निधनानंतर घाणेरडे राजकारण करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करून कोणीतरी बनावट पत्र बनवले आणि मला गटनेते पदापासून रोखले गेले, असा गंभीर आरोप डॉ. पाटील यांनी केला होता.

अजित दादांनी मला शब्द दिला असताना सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच राष्ट्रवादीच्या गटापासून फारकत घेत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा इशाराही पक्षाला दिला होता. त्यांच्या इशाऱ्याची पक्षाने दखल घेतली नसल्याने अखेर डॉ. पाटील यांनी स्वतंत्र सदस्य नोंदणी केली आहे. डॉ. पाटील यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतो, याकडे लक्ष आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group