Nashik : ज्योतिष्याने  गुंतवणूकदारांना घातला ७३ लाखांचा गंडा
Nashik : ज्योतिष्याने गुंतवणूकदारांना घातला ७३ लाखांचा गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ज्योतिष्याने गुंतवणूकदारांना ७३ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना शरणपूर रोड परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी सचिन देशमुख (रा. अंजनेय ज्योतिष केंद्र, शरणपूर रोड, नाशिक) हा प्रख्यात ज्योतिषी पंडित आहे. देशमुख याने फिर्यादी व इतर तक्रारदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली वेळोवेळी ऑनलाईन झूम मीटिंग व कार्यालयात बैठक घेऊन गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वेगवेगळ्या आयडी देऊन हमीपोटी प्रगती एंटरप्रायजेसच्या बँक खात्याचा चेक व अ‍ॅग्रीमेंट करून दिले.

सुरुवातीला फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीवर नाममात्र परतावा देऊन संशयित देशमुख याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने दिलेल्या प्रगती एंटरप्रायजेस कंपनीच्या एच. डी. एफ. सी. बँकेच्या खात्यावर, तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी एकूण ७३ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले; मात्र मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवूनही परतावा मिळाला नाही.

फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांचा संशयित देशमुख याने विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात सचिन देशमुख याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group