दुर्दैवी अंत: 'Everyone Sorry' म्हणत  तरुणाने संपवलं जीवन
दुर्दैवी अंत: 'Everyone Sorry' म्हणत तरुणाने संपवलं जीवन": रेस्क्यू टीमने बाहेर काढला मृतदेह
img
दैनिक भ्रमर



पुणे: पुण्यातील खडकी परिसरातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला आहे. अमर राजेंद्र कदम असे या मृत तरुणाचे नाव असून, राजगड तालुक्यातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खडकी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

अमर कदम हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर खडकी पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार (मिसिंग) दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत असतानाच, राजगड तालुक्यातील साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

वरसगाव परिसरात वस्तू सापडल्याने संशय बळावला

धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अमरचे ओळखपत्र, त्याचे कपडे आणि मोबाईल या वस्तू आढळून आल्या. याची माहिती मिळताच साईव खुर्द येथील पोलीस पाटील रुपाली पंडित यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना पाचारण केले. धरणाच्या पाण्यात अमर असण्याची शक्यता असल्याने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलावण्यात आले.

रेस्क्यू टीमची शोधमोहीम

हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. धरणाच्या पाण्याचा प्रवाह खोल असल्याने शोधमोहिमेत सुरुवातीला अडथळे येत होते. मात्र, टीमने अत्यंत चपळाईने शोध मोहीम राबवली. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर अमर कदम याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

'Everyone Sorry' स्टेटस आणि आत्महत्येचा संशय

अमरने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याने मृत्यूआधी आपल्या मोबाईलवर 'Everyone Sorry' असा स्टेटस ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे. या स्टेटसमुळे आणि घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस तपास सुरू

या शोधमोहिमेत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आणि अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. या घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group