क्षणाचा राग अन् आयुष्य संपलं! आईसोबतच्या पैशांच्या वादातून ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी
क्षणाचा राग अन् आयुष्य संपलं! आईसोबतच्या पैशांच्या वादातून ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी
img
नितीशा कुलकर्णी





नाशिकच्या पंचवटी परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पैशांच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण दुर्घटनेत झाले. रागाच्या भरात आणि नैराश्यातून या व्यावसायिकाने मध्यरात्री मृत्यूला कवटाळले असून, यामुळे दोन मुले पोरकी झाली आहेत.

आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात घडली. देवेंद्र संजय थोरात (३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला.

मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास देवेंद्र यांनी नैराश्यातून घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. खाली पडल्यामुळे देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे मेहुणे गौरव जयवंत वायकुळ यांनी त्यांना उपचारासाठी आडगाव नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणीअंती पहाटे मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज सोनवणे, सहायक उपनिरीक्षक दत्तू शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. मृत देवेंद्र थोरात यांच्या पश्चात आई आणि दोन मुले असा परिवार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group