नाशिक : अशोक खरातच्या घरातून ईडीच्या हाती लागले घबाड
नाशिक : अशोक खरातच्या घरातून ईडीच्या हाती लागले घबाड
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर वृत्तसेवा) :- अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून खरातने एक मोठे आर्थिक जाळे विणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या घरात मालमत्तेच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे सापडली आहेत. शासकीय नोंदणी न करता केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मालमत्तांचे व्यवहार करून खरातने अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. कराची चोरी करण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी मालमत्तांची अधिकृत नोंदणी न करता केवळ कच्च्या पावत्यांवर हा व्यवहार सुरू होता.

धाडीदरम्यान तपास यंत्रणांनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मनी लॉण्डरिंगसाठी काही ‘शेल कंपन्या’वापरल्या गेल्याचा संशय असून, त्या माध्यमातून व्यवहारांचे वळण फिरविण्यात आले आहे. अशोक खरात विरोधात आता तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. शेल कंपन्या, बनावट व्यवहार व नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाते, सीडीआर व आयकर रिटर्नची छाननी सुरू आहे. त्यामुळे खरातच्या विरोधात तपासाचा फास आवळत चालला असून, मनी लॉण्डरिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अशोक खरातवर विविध गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या पत्नीवरही गुन्हे दाखल असून, कल्पना खरात अद्याप फरार आहे. न्यायालयात कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू असून, शुक्रवारी पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.आता पुढील सुनावणी आता 22 एप्रिल रोजी होणार आहे.

आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असतानादेखील वकिलांच्या विनंतीवरून ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. मूळ फिर्यादीच्या विनंतीनंतर न्यायालयाने ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group