द्वारका चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविले
द्वारका चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविले
img
दैनिक भ्रमर



नाशिक (सुधीर कुलकर्णी) :- आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारका चौक आणि परिसरात मनपाने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण मोहीम राबवून अनेक स्टॉल्स, फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करीत अनधिकृत फलकेही हटविली.

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महामार्गालगतच्या या परिसरात गॅरेज, दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही अवघड झाल्याने काही व्यावसायिकांसह नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली होती. या भागात प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

त्या पार्श्‍वभूमीवर आ. देवयानी फरांदे यांनी नुकतीच द्वारका परिसराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे कालच झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेत अतिक्रमण विषयावर अधिकार्‍यांवर ताशेरे ओढत जोरदार चर्चा झाली.

त्या अनुषंगाने ही अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याने या मोहिमेचे महत्त्व अधिक वाढले आहे. द्वारका परिसरातील प्रमुख मार्गांवर अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होता. त्यानुसार प्रशासनाने नियोजनबद्ध् कारवाई करीत रस्त्याच्या कडेला उभारलेले फेरीवाले, हातगाड्या, तात्पुरते शेड्स तसेच पादचारी मार्ग अडवून ठेवलेले साहित्य हटविण्यात आले. काही ठिकाणी व्यापार्‍यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली, तर उर्वरित ठिकाणी पथकाने कारवाई करत साहित्य जप्त केले. जप्त केलेले साहित्य आडगाव गोदाम येथे जमा करण्यात आले आहे. 

मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार पश्‍चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक जाधव, पश्‍चिम गाडी प्रमुख प्रवीण बागुल, सुनील कदम, बापू लांडगे, संजय सूर्यवंशी, जगन्नाथ हमारे, मोहन भांगरे, शुभम खैरनार, दीपक गायकवाड, संतोष पवार आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता या भागात कायम अचानकरीत्या मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा सूत्रांनी दिला. 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group