नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक शहरात खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘फिजिक्सवाला’ कोचिंग क्लासमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनसेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्लासमधील कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना शरणपूर रोड परिसरात घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिजिक्सवाला क्लासचा विद्यार्थी श्रेयस शिंदे व इतर मराठी मुलांना क्लासमध्ये त्रास देवून क्लासचे कर्मचारी हिंदीत बोलण्यास लावतात. या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्लासवर धडक दिली. त्यांनी तेथील कर्मचारी अभिनव कुमार यास मारहाण करून क्लासमधील सर्व हिंदी बोलणार्या शिक्षकांना सात दिवसांच्या आत राजीनामा घेऊन त्यांना मुळगावी पाठवावे नाहीतर, सात दिवसांनंतर क्लासची तोडफोड करू, अशी धमकी मनसेचे अक्षय कोंबडे, ललित वाघ, रोहित उगांवकर, बाजीराव मते व इतरांनी दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.