नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. रासेगाव व देहरेवाडी येथील ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारतानारंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार हे गावचे उपसरपंच असून, त्यांच्या विरोधातील अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये ठरले, ज्यापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने सापळा रचून या लाचखोर दाम्पत्याला पकडले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंचांनी स्वतः १४ हजार रुपये तर त्यांच्या पतीने एक हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.