नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कन्स्ट्रक्शन्स कंपनीची जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्यासाठी दिलेली रक्कम भरणा न करता अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कैलास भाऊसाहेब कराळे (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्याकडून आरोपी ललित ज्ञानेश्वर कदम व शशांक ज्ञानेश्वर कदम यांनी धनंजय कन्स्ट्रक्शन्सच्या जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्याकरिता वेळोवेळी 2 कोटी 25 लाख 37 हजार 816 रुपये स्वीकारले. त्यापैकी 1 कोटी 24 लाख 46 हजार 35 रुपयांची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. आजतागायत ही रक्कम व त्यावरील व्याज व दंड मिळून एकूण 2 कोटी 42 लाख 60 हजार 535 रुपये असे जीएसटी विभाग व इन्कम टॅक्स विभागात न भरता दोघा भावांनी संगनमत करून फिर्यादी कैलास कराळे यांची फसवणूक केली.
हा प्रकार सन 2019 पासून ते दि. 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत धनंजय कन्स्ट्रक्शन्सच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या गोविंदनगर शाखेत घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघा भावंडांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.