नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्र दाखवून दोन जणांची तीन लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी संजय वानखेडे (रा. नाशिक) याने फिर्यादी प्रभाकर भाऊसाहेब ठेंगडे (रा. वकील कॉलनी, राजेशनगर, छत्रपती संभाजीनगर) व साक्षीदार शेजूळ यांच्या मुलांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा शिक्का असलेले बनावट नियुक्तिपत्र दाखवून फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी वानखेडे यांनी फिर्यादी ठेंगडे यांच्याकडून एक लाख रुपये व साक्षीदार शेजूळ यांच्याकडून दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये घेतले; मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारची शासकीय नोकरी लावून न देता तीन लाख रुपयांचा अपहार करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जून 2025 ते 23 मार्च 2026 या कालावधीत अंबड एमआयडीसी गरवारे पॉईंट परिसरात सतीश संजय वानखेडे (रा. नाशिक) येथे घडला.
या प्रकरणी संजय वानखेडेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीतआहेत.