Maharashtra Rain : नाशिकसह 'या' १२ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, गारपिटीसह जोरदार पाऊस, निफाड...
Maharashtra Rain : नाशिकसह 'या' १२ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, गारपिटीसह जोरदार पाऊस, निफाड...
img
वैष्णवी सांगळे
राज्यावरील अवकाळी संकट अजूनही टळलेले नाही. सोमवारी वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. तर आज मंगळवारी देखील राज्यातील अनेक भागात ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला असून आज राज्यातील १८ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर १२ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील २४ तास धोक्याचे असणार आहेत. यावेळी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यालाच खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.



नाशिककरांनो पाणी जपूनच वापरा ! नाशिक शहरातील पाणी पुरवठा 'या' दोन्ही दिवशी बंद राहणार

आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला. बाकी संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट आहे. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. 

कालपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. निफाड , सिन्नर , मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्राथमिक अहवालानुसार एकूण ४८२.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील सात गावांमधील १,१५२ शेतकरी या आपत्तीमुळे प्रभावित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अहवालानुसार सर्वाधिक फटका निफाड आणि सिन्नर तालुक्यांना बसला आहे. निफाडमधील तीन गावातील ७६३ शेतकरी प्रभावित झाले असून सुमारे २६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यातील तीन गावातील ३७९ शेतकरी प्रभावित असून सुमारे २०९.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 

याशिवाय नाशिक तालुक्यात एका गावातील १० शेतकऱ्यांचे सुमारे पाच हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. इतर तालुक्यांमध्ये सध्या नुकसानाची नोंद नाही. रविवारी झालेल्या पावसामुळे कांदा १९५ हेक्टर, मका ५२ हेक्टर, गहू १२२.७० हेक्टर, इतर पिके ८० हेक्टर असे नुकसान नोंदवण्यात आले आहे. फळपिकांमध्येही मर्यादित नुकसान झाले असून सुमारे पाच हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची नोंद आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही भागात गारपीटही झाल्याची माहिती मिळत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. विशेषतः काढणीला आलेला गहू, कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group