नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, सोमवारी रात्री जय भवानी रोड परिसरात गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध 'सावता माळी स्वीट्स मार्ट' चे मॅनेजर मंजूर सय्यद यांना लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोराने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. नशिबाने गोळीचा नेम चुकला आणि मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्याच वेळी तांत्रिक कारणास्तव परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वत्र काळोख आणि पावसाची रिपरिप सुरू असतानाच एका अज्ञात हल्लेखोराने चेहरा रुमालाने बांधून दुकानाजवळ प्रवेश केला. त्याने थेट मॅनेजर मंजूर सय्यद यांच्यावर कट्टा रोखला आणि ट्रिगर दाबला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली, पण सुदैवाने सय्यद बालंबाल बचावला.
गोळी झाडल्यानंतर आरडाओरड होताच हल्लेखोराने आपली दुचाकी सुरू केली आणि जय भवानी रोडच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो काही क्षणातच दिसेनासा झाला. आवाजामुळे आजूबाजूचे लोक धावून आले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक रिकामे काडतूस (खोका) सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मॅनेजरचा जबाब नोंदवला आहे. हा हल्ला जुन्या वादातून झाला की यामागे 'खंडणी'सारखे मोठे रॅकेट सक्रिय आहे, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील दुकाने आणि रस्त्यांवरील कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. घटनेनंतर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली असून संशयितांची झाडाझडती सुरू आहे. गजबजलेल्या भागात भरवस्तीत अशा प्रकारे हल्ला झाल्याने व्यापारी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.