नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-आयुष्यभर रेल्वेचे इंजिन हातात धरून हजारो प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणाऱ्या एका कर्तव्यदक्ष हातांचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. नाशिक रोड येथील दत्त मंदिर सिग्नल परिसरात दुपारी झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त लोको पायलट विष्णू शंकर पगारे (६६) यांचा जागीच मृत्यू झाला. ऊस वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना चिरडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
जेलरोड भागातील शिवाजीनगर, नवरंग कॉलनी येथे राहणारे विष्णू पगारे हे रेल्वेतून लोको पायलट म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी दुपारी ते दत्त मंदिर परिसरातील बँकेत कामानिमित्त गेले होते. बँकेतील काम आटोपून ते पायी बिटकोच्या दिशेने येत असताना, रामनगरकडे रस्ता ओलांडत होते. याचवेळी सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या ऊस भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक: MH 15 JC 9219) त्यांना जोराची धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की पगारे रस्त्यावर कोसळले. आयशरचे चाक त्यांच्या मानेवरून गेल्याने त्यांचा जागीच प्राणज्योत मालवली. अपघातानंतर चालक पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच दत्त मंदिर सिग्नलवरील वाहतूक पोलिसांनी धाव घेत पगारे यांना बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हजारो जीव वाचवले, स्वतःचा जीव वाचला नाही!
विष्णू पगारे यांनी रेल्वे विभागात अनेक वर्षे सेवा दिली. हायस्पीड गाड्या चालवताना शेकडो प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात असायचा. निवृत्तीनंतरचे शांत आयुष्य जगत असताना एका बेजबाबदार वाहन चालकामुळे त्यांचा अंत व्हावा, याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 'लोहमार्गावर कधीही न डगमगलेले पाय रस्त्यावर मात्र काळाने ओढले', अशी भावना त्यांच्या परिचितांनी व्यक्त केली.