नाशिक : कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाची 14 लाखांची फसवणूक
नाशिक : कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाची 14 लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बांधकाम व्यवसायाकरिता पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून भामट्याने एका बिल्डरची 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दिलीद ओघवजी ठक्कर (रा. साई आनंद गजानन मार्ग, इंदिरानगर) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपी हेमराज जीवनलाल भावसार (रा. नाशिक) याने ठक्कर यांना विश्‍वासात घेऊन बांधकाम व्यवसायाकरिता पाच कोटी रुपये मंजूर करून देतो, असे सांगून फिर्यादीच्या रविवार कारंजा येथील इमारतीचे खरेदी खत, अप्रूव्हल प्लॅन, कमेन्समेंट लेटर, आधारकार्ड, पॅनकार्ड व सिटी सर्व्हे उतारा अशी कागदपत्रे घेतली. 

त्यानंतर आरोपीने एमबीएस कंपनीचे पाच कोटी रुपयांचे लोन सँक्शन झाल्याचे बनावट लेटर दिले, तसेच आरटीजीएस फॉर्म, त्याचे मॉर्बल सोल्यूशन कंपनीचे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेतील खात्याचा 4 कोटी 90 लाख रुपयांचा चेक दिला. त्यानंतर कर्जमंजुरीची प्रोसेसिंग फी म्हणून आरोपी भावसार याने फिर्यादी ठक्कर यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएसद्वारे 14 लाख रुपये घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, तसेच फिर्यादीने दिलेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून त्या रकमेचा अपहार केला. 

हा प्रकार दि. 24 जून ते 4 जुलै 2025 या कालावधीत गंगापूर रोड येथे घडला. या प्रकरणी हेमराज भावसारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group