जुन्या भांडणाची कुरापत काढून मध्यरात्री तरुणाला संपवलं; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना
जुन्या भांडणाची कुरापत काढून मध्यरात्री तरुणाला संपवलं; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना
img
वैष्णवी सांगळे
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. मागील भांडणाची कुरापत काढून शेख सलीम शेख चांद उर्फ मोहम्मद मोट्या (वय ३२) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



मृत सलीम शेखचा भाऊ शेख हनिफ चांद उर्फ राजू यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मालेगाव शहरातील बीडी गोडाऊन समोर घडली. 5 ते 7 जणांच्या टोळक्याने हातात हत्यारं घेऊन तरुणाचा पाठलाग केला आणि त्याचा निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 

घटनेच्या वेळी मयत सलीम हा मालेगाव शहरातील अख्तराबाद भागातील बीडी गोडाऊनजवळ उभा होता. यावेळी सात ते आठ संशयित हातात लाठ्या, काठ्या, कोयते, तलवार घेऊन तिथे आले. त्यांनी फिर्यादी हनिफ यांचा भाऊ आणि त्याचा एक मित्र बिडी गोडाऊन अख्तराबाद येथे उभे असताना त्यांच्याजवळ जाऊन मागील भांडणाच्या कुरापतीतून धारदार तलवारीने सलीमच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच अन्य जणांनी हातातील कोयत्याने सलीमच्या डोक्यावर व हातापायावर मारहाण केली. या गंभीर मारहाणीत सलीमचा मृत्यू झाला.

खूनाची ही घटना उघडकीस येताच मालेगाव पोलिसांनी सात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group