निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे सुमारे 55 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भारतातील दुसर्या श्री कामाख्या माता मंदिराच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंचकुंडात्मक शतचंडी याग व अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात सध्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार दि. 27 मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडणार आहे.
या धार्मिक महोत्सवाची सुरुवात भव्य दिव्य मिरवणुकीने झाली. मूर्ती व कलशांची विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात होणारी ही मिरवणूक भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर आठवडाभर विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, होमहवन, जप-तप, यागयज्ञ आणि प्रवचनांच्या माध्यमातून आध्यात्मिक वातावरण निर्माण केले जाणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, विकास महाराज देवडे, तुकाराम महाराज मुंळीळ, प्रकाश महाराज जवंजाळ, अक्रूर महाराज साखरे, ज्ञानेश्वर महाराज झळकेकर, बाळू महाराज गिरगावकर, तसेच अशोक महाराज इलग यांचे प्रेरणादायी कीर्तन होणार असून, भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार आहे, तसेच गायनाचार्य व मृदंगाचार्य यांच्या सहभागामुळे सप्ताह अधिक रंगतदार होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेला पंचकुंडात्मक शतचंडी याग विशेष वेदमंत्रांच्या गजरात होणार आहे. यामध्ये देशभरातील विद्वान वेदज्ञ ब्राह्मणांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी पार पडतील. सकाळी लवकर सुरू होणारे पूजाविधी, अभिषेक, नवचंडी पाठ, हवन आणि आरतीमुळे वातावरण अधिकच पवित्र होत आहे. या सोहळ्यात पंचकुंडात्मक शतचंडी याग, विविध धार्मिक विधी, तसेच सकाळपासून सायंकाळपर्यंत पूजाअर्चा पार पडणार आहे.
दररोज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दि. 27 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसाद (महाभंडारा) आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पीठाधीश्वर श्री गणेशबाबा जयराम जगताप व त्यांच्या परिवाराच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून, धारणगाव खडक परिसरात या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.