नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी आल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार शंभर दिवसांच्या पाहणी दौर्यातील आज महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या उपस्थितीत नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 31 मधील विविध विकासकामांचा पाहणी दौरा करण्यात आला.
नगरसेवक भगवान दोंदे यांचे संपर्क कार्यालय ज्ञानेश्वरनगर, आव्हाड पंपाशेजारी, प्रभाग क्रमांक 31 येथून पाहणी दौर्याला सुरुवात झाली. अमृतानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, खत प्रकल्प दाढेगाव आदी भागांत नागरिकांना भेटून समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी पाणी, रस्ता, खड्डे आदी विषयांवर भूमिका मांडत आपली नाराजी व्यक्त केली.
या पाहणी दौर्यादरम्यान प्रभागातील खड्डे व पाणी या प्रमुख विषयांवर चर्चा करून प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रभाग 31 मध्ये दूषित व कमी दाबाने पाणी येणे, तसेच अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणे अशा विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम असून, टाक्यांमध्ये वेळेवर पाणी न भरणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ न करणे, तसेच दूषित पाणी येणे अशा तक्रारी कथन करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासक काळात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकारी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. आता लोकप्रतिनिधी निवडून येऊन दोन महिने उलटूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. पाथर्डी गाव व परिसरातही अशाच प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असून, त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.