नाशिक - केलेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कार्यकारी अभियंता आणि लेखा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यांनी बिल अदा करण्यासाठी म्हणून एका मजूर सहकारी सोसायटीकडुन लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील एका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्यादित यांनी नियमाप्रमाणे जिल्हा परिषद योजनेतील सिमेंट काँक्रीट बंदरात दुरुस्ती कामाची निविदा सुमारे 9 लाख 74 हजार 887 रुपयाचे काम पूर्ण केले होते.
या कामाची रक्कम 8 लाख 9 हजार 131 रुपये तसेच ओझरखेड येथील तुंगार्वाडी येथील बिगर आदिवासी क्षेत्र या ठिकाणी केलेल्या कामाचे सुमारे 9 लाख 75 हजार 147 रुपयाचे काम या मजूर सहकारी सोसायटीने पूर्ण केले होते. त्यांची एकूण 16 लाख 19 हजार 290 रुपयाचे बिल अदा करण्यासाठी म्हणून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात सादर करण्यात आले होते.
लघु पाटबंधारे विभागात हे बिल सादर करण्यात आल्यानंतर या विभागाचे वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी अरुण धारणकर आणि लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांनी संगणमत करून एका मजूर बांधकाम सहकारी सोसायटी कडे बिल अदा करण्यासाठी म्हणून 75 हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करण्यामध्ये यश आले आणि 50 हजार रुपये एवढी रक्कम निश्चित करण्यात आली.
आज पंचांसमक्ष दुपारी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि लेखा वरिष्ठ सहाय्यक अरुण धारणकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक भरत तांगडे, अतिरिक्त अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.