Nashik Crime : रो-हाऊस खरेदीचा व्यवहार करून एकाची 48 लाखांची फसवणूक
Nashik Crime : रो-हाऊस खरेदीचा व्यवहार करून एकाची 48 लाखांची फसवणूक
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रो हाऊस खरेदीचा व्यवहार करून नंतर कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करून एका इसमाची 48 लाखांची फसवणूक केल्याची घटना कामटवाडा परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी दत्ताराम संपतराव राजोळे (रा. वृंदावननगर, कामटवाडे) याने फिर्यादी गणेश रघुनाथ महाजन (वय 46, रा. राजीवनगर) यांच्यासोबत मालमत्ता विक्रीचा व्यवहार केला. हा व्यवहार 50 लाख रुपयांचा ठरला होता. त्या बदल्यात राजोळे याने फिर्यादी महाजन यांच्याकडून 48 लाख 60 हजार आरटीजीएस व रोख स्वरूपात स्वीकारले होते.

त्यानंतर फिर्यादी महाजन हे राजोळे व वकिलाला घेऊन त्र्यंबक नाक्यावरील रजिस्ट्री कार्यालयात खरेदी करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2025 रोजी गेले होते. तेथे आरोपीने महाजन यांच्याकडून खरेदीच्या प्रतीवर व साठेखताच्या प्रतीवर स्वाक्षर्‍या करून घेत त्यांना ती कागदपत्रे दिली; मात्र या कागदपत्रांमध्ये खरेदीची प्रत नसल्याने महाजन यांनी राजोळेकडे विचारणा केली. त्यावेळी राजोळेने सांगितले, की माझे अजून सात-बारा उतार्‍यावर नाव लागलेले नाही. नाव लागताच मी तुम्हाला खरेदीची प्रत देतो. 

काही दिवसांनंतर राजोळेने स्वत:चे नाव सात-बारा उतार्‍यावर लावून घेतले. तरीही तो खरेदी देण्यास टाळाटाळ करून आज देतो, उद्या देतो, असे म्हणत वेळ मारून नेत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी दत्ताराम राजोळे याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group