आधी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्…
आधी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्…
img
वैष्णवी सांगळे
नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूबाबा आणि त्यांचे दुष्कृत्य समोर आले आहेत. मुंबईत देखील आता एका भोंदूबाबाविरोधात तक्रार झाली. भूत उतरवण्याची बतावणी करत मुंबईच्या मालाड भागातील भोंदूबाबा धक्कादायक कृत्य करत होता. अखेर स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आठवड्यानंतर रिदम पांचाळवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी भोंदूबाबा रिदम पांचाळला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून अटक केली आहे. 



भाजपचे माजी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा यांच्या सतर्कतेमुळे या बाबाचे बिंग फुटले आहे. आतापर्यंत ६० हून अधिक पीडितांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सिद्धार्थ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिदम पांचालचे आयुष्य चार वर्षांपूर्वीपर्यंत एका सामान्य जिम ट्रेनरप्रमाणे होते. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने बाबा बनण्याचा मार्ग निवडला. लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने मालाडमधील एका मोकळ्या मैदानात दर गुरुवारी आणि शनिवारी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दरबार भरवण्यास सुरुवात केली.

या बाबाचा दावा होता की, त्याच्यावर देवी अवतरते आणि तो कोणतेही आजार बरे करू शकतो. विशेषतः मूल न होणाऱ्या महिलांना तो गंडा घालत असे. त्याच्या उपचार पद्धती अत्यंत संशयास्पद होत्या. तो मध्यरात्री महिला आणि मुलींना बोलावून पूजेच्या नावाखाली अश्लील कृत्य करायचा. तसेच उपचार करण्याच्या मोबदल्यात तो भक्तांकडून मोठी रक्कम, महागडी दारू, सिगारेट, जिवंत कोंबडी आणि बोकडाचे काळीज यांची मागणी करत असे. त्यासोबतच भूतबाधेचे ढोंग करत तोंडात सिगारेट पेटवून तो भक्तांच्या अंगातील भूत उतरवण्याचे नाटक करायचा.

आतापर्यंत तो त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप करत होता. मात्र 4 एप्रिलला तर हद्दच झाली.  त्याने चक्क महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार  केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत. 

भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घेतो. चार रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे. जादुटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला, मुलांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group