संतापजनक ! लोखंडी रॉडने वार करून पत्नीची हत्या ; चिमुकल्याला मित्राकडे सोडून पती पसार
संतापजनक ! लोखंडी रॉडने वार करून पत्नीची हत्या ; चिमुकल्याला मित्राकडे सोडून पती पसार
img
वैष्णवी सांगळे
सांगली जिल्ह्यातील विटा येथे प्रेमविवाहाला भयानक अंत झाला आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची संतापजनक घटना विटा येथे घडली आहे. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.  संशयित पती अविनाश तुकाराम लोटके हा फरार झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश लोटके याचा विवाह दीपाली साठे यांची भाची काजल हिच्याशी चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता. महत्त्वाचे म्हणजे हा प्रेमविवाह होता. काजलची आई मुंबईत राहत असल्याने काजल लहानपणापासून मावशी दीपाली साठे यांच्याकडेच राहत होती. लग्नानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे.सोमवारी रात्री उशिरा अविनाश आणि काजल हे अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पहाटे अविनाशने "पत्नी काजल मला न सांगता कुठेतरी बाहेर गेली आहे" असे सांगत आपल्या मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे तीन वर्षांचा मुलगा ठेवला आणि तो निघून गेला.

बराच वेळ उलटूनही अविनाश परत न आल्याने रोहित त्याच्या घरी गेला. घराच्या खिडकीतून पाहिले असता घरात फरशीवर मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले दिसले. त्याने ओरडत दार उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र आतून कडी लावलेली होती. त्यानंतर रोहितने घरमालकाशी संपर्क साधून त्यांना बोलावले आणि विटा पोलीस ठाण्यालाही कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख कृष्णदेव गडदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. विटा येथील विभागीय फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तपास करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group