नाशिक : महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पती नीलेश दत्तात्रय जेजुरकर (वय 46) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 6 मार्च रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पतीमुळे डॉ. मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्यांनी केला होता.

या प्रकरणी रोहिणी वैभव थोरात (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 6 मार्च रोजी त्यांची बहीण मनीषा हिने आत्महत्या केली असून, ती बेशुद्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या त्वरित बहिणीच्या घरी दाखल होत त्यांनी, भाऊ गौरव आणि पती नीलेश यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून डॉ. मनीषा जेजुरकर यांना मयत घोषित केले.

फिर्यादी रोहिणी थोरात यांनी आरोप केला आहे, की मनीषा या जेलरोड येथून गंगापूर रोड येथे सन 2021 पासून राहण्यास आल्या होत्या. तेव्हापासून पती नीलेश हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरसोबत जवळीक साधून तिला घरातील सर्व बारीकसारीक गोष्टी सांगत होता. ती म्हणेल तसा तो घरात वागून मनीषाकडे दुर्लक्ष करून तिला मानसिक त्रास देत होता. नीलेशच्या या वागणुकीमुळे डॉ. मनीषा या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. नीलेशने डॉ. मनीषा यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

या प्रकरणी पती नीलेश जेजुरकर याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group