नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : कॉलेज रोडवरील बिग बझारजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यातील नऊ जणांपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अंधारात इतर 5 जण पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांचे पथक कॉलेज रोडवरील बिग बझारसमोर पाटील लेन येथे रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास संशयित सोनू महंमद मासीआलम (वय 32, रा. नवी दिल्ली), कैसर मोहम्मद कलिमउद्दीन (वय 31, रा. दिल्ली), राजेशकुमार पांडे (मूळ रा. बिहार, ह. मु. दिल्ली), कपिल सपन खडिया (वय 41), संदीप, इलियास मोसिम मुकादम, मोहंमद राजा, सलमान, वीरू, सूरज व त्यांचे पाच ते सहा साथीदार हे सर्व जण बी. एस. एन. एल. ची अंडरग्राऊंड केबल, तसेच एमएच 15 ईएल 7284 या क्रमांकाची अॅक्टिव्हा मोपेड चोरी करून तिच्यावर बसून परिसराची रेकी करून दरोडा टाकण्याची तयारी करताना मिळून आले.
यावेळी पोलीस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे हेल्मेट, 20 बाय 20 फुटांचे वायर लूप, वेगवेगळ्या कंपन्यांचे तीन मोबाईल असा 48 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन काही दरोडेखोर पळून गेले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.