नाशिक : राजुर गावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह, ओळख अद्याप अस्पष्ट
नाशिक : राजुर गावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह, ओळख अद्याप अस्पष्ट
img
वैष्णवी सांगळे
वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ शिवारातील राजुर गावाजवळ बडगुजर आणि चोकशी यांच्या खडी क्रशर कारखान्याजवळील ओसाड माळरानावर सुमारे 25 वर्षांच्या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

प्राथमिक तपासात तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचा टि शर्ट आणि  फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात पांढरे स्पोर्ट्स शूज आणि काळे सॉक्स होते. गळ्यात बारीक पिवळ्या धातूची साखळी तसेच दोन्ही हातांच्या बोटांत बारीक धातूच्या अंगठ्या आढळून आल्या आहेत. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. 

या प्रकरणी वाडीव-हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील तसेच इतर पोलीस हद्दीत अलीकडील काळात एखादी तरुणी बेपत्ता असल्यास संबंधितांनी तात्काळ वाडीव-हे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

खून पूर्वनियोजित होता की एखाद्या वादातून घडला, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही व कॉल रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाची अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group