सातपूर कॉलनीत भिंत कोसळून अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
सातपूर कॉलनीत भिंत कोसळून अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

सातपूर- कॉलनी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून जीर्ण घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
   
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हुजेर खान (वय २.५, रा. गल्ली नंबर ८, कामगार भवन, सातपूर कॉलनी) हा चिमुकला कामगार भवन मंडळाच्या जवळ असलेल्या एका जुन्या व मोडकळीस आलेल्या घराजवळ खेळत असताना अचानक घराची भिंत कोसळून त्याच्या अंगावर भिंत कोसळली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या हुजेर खान याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने हुजेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

हे घर अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होते. भिंतींना तडे गेलेले असूनही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद सातपूर पोलिस ठाणे येथे करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
सातपूर परिसरात अनेक ठिकाणी जुनी व मोडकळीस आलेली घरे असून ती धोकादायक बनली आहे.धोकादायक घरे, इमारतीची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group