नीट पेपरफुटी प्रकरणामुमुळे देशभरात खळबळ माजली असून नीट परीक्षा २०२६ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली असून आता या प्रकरणात नाशिक कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणी नाशिकमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 3 मे रोजी देशभारत नीट परीक्षा झाली होती. डॉक्टर होण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परंतु आता या परीक्षेतील प्रश्नपत्रिका अगोदरच फुटली होती, असे म्हटले जात आहे.
त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला होता. त्यानंतर नाशिकहून हा पेपर हरियाणात नेण्यात आला. तेथे तो पेपर एका डॉक्टरकडे पोहोचवण्यात आला. हरियाणातून हा पेपर पुढे राजस्थान राज्यातील जयपूर येथे पोहोचला. जयपूरहून नंतर तो जमवा रामगड येथे नेण्यात आला.
जमवा रामगड येथून तो पेपर सिकर येथे पोहोचला. त्यानंतर सिकरहून तो अन्य राज्यांत गेला. जम्मू काश्मीर, बिहार, केरळ या राज्यांत तो पोहोचवण्यात आला आहे. नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसशी संबंधित त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नीटची घेतलेली परीक्षा रद्द झाल्यामुळे आता विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. दिल्लीमध्ये तर पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आता नीटची ही परीक्षा नेमकी कधी होणार, याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.