नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असून आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे .
या प्रकरणी तपासात पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक 'प्रत्यक्षदर्शी' पुरावा लागला आहे. नराधम आरोपी चिमुकलीवर अत्याचार करत असताना तिथे खेळणाऱ्या 4 ते 5 लहान मुलांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
या प्रकरणात आता एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचे वळण आले आहे. ज्यावेळी हा नराधम चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करत होता, त्यावेळी तिथल्या 4 ते 5 लहान मुलांनी त्याला पाहिले होते. मात्र, या नराधमाने त्या निष्पाप मुलांना दगड फेकून मारत तिथून पळवून लावले आणि त्यानंतर घृणास्पद कृत्य सुरूच ठेवले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 'वासरू दाखवतो असे आमिष दाखवून चिमुकलीला गोठ्यात नेले होते. तिथे खेळणाऱ्या इतर काही मुलांच्या लक्षात काहीतरी चुकीचे घडत असल्याचे आले. ही मुले गोठ्याकडे धावली आणि त्यांनी नराधमाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या नराधमाने लहान मुलांवरच दगड भिरकावले. घाबरलेली मुले तिथून पळून गेली, ज्याचा फायदा घेत नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला.
दरम्यान , पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुले गोठ्याकडे जाताना आणि आरोपी त्यांना दगड मारून पळवताना स्पष्ट दिसत आहे. हा या प्रकरणातील सर्वात ठोस प्रत्यक्षदर्शी पुरावा मानला जात आहे. पोलिसांनी या लहान मुलांची ई-साक्ष' देखील नोंदवून घेतली असून, यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रत्यक्षदर्शी पुराव्यामुळे आता या नराधमाला फाशीची शिक्षा करण्याची, अशी मागणी जोर धरू लागली आहे.