नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- महिला स्त्री बीज तस्करीप्रकरणी ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या सर्व प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत असून नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरला नाशिक महानगरपालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली असून, याप्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्री बीज तस्करी करून ज्या परिवाराला मुले होत नाही त्यांना देशात आणि विदेशात देऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार केला जात होता. सर्व गोरख धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता. गरजू गरीब आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांचा यासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यामध्ये ठाण्यातील एका रुग्णालयात एका महिलेला घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेचे बीज अंकुरे काढून घेऊन त्याबाबत एक सौदा केला जात असल्याची माहिती येथील उपप्रथमिक रुग्णालयाला मिळाल्यानंतर येथील सरकारी डॉक्टरांनी पोलिसांच्या मदतीने एका घरावर छापा मारून याबाबत कारवाई केली होती.
या कारवाईनंतर या ठिकाणी तपास केला जात असताना पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली. त्यामध्ये पोलिसांनी स्त्री बीज तस्करी प्रकरणात ठाण्यातील काही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी देखील केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीमध्ये एका आलिशान इमारतीत राहून या स्त्री बीज तस्करी प्रकरणात व्यवहार होत असल्याचे समोर आले.
या सर्व प्रकरणामध्ये ठाण्यातील पोलिसांना तपास करत असताना अनेक धक्कादायक माहिती मिळाली. त्या माहितीमध्ये नाशिक शहरात असलेल्या एका आयव्हीएफ सेंटरचा संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील एका आयव्ही फ सेंटरमध्ये छापा टाकून यातील कागदपत्रे जप्त केली आहेत. या ठिकाणी अजून काही माहिती गोळा केली असून येथे काम करणार्या कामगार आणि डॉक्टरांचे जबाब ठाणे पोलिसांनी नोंदवल्याचे सांगितले जात आहे .
ही सर्व घटना समोर आल्यानंतर नाशिक महानगरपालिका देखील सावध झाली असून ही माहिती मिळाल्यानंतर काल नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने या आयव्हीएफ सेंटरला नोटीस दिली आहे. ठाणे महानगरपालिकेने याबाबतची नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकचे नाव आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून आता ठाणे पोलीस या सर्व प्रकरणी राज्यात देखील तपास करत आहेत.
बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्या आयव्हीएफ सेंटरवर तसेच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली. तसेच हे प्रकरण नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरमध्येही सुरू होते. त्या सेंटरच्या माध्यमातून हे कृत्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. स्त्री बीज तस्करी प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या पाचही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचे समोर आले आहे. तसेच हे रॅकेट बदलापूर पुरते मर्यादित नसून याची पाळेमुळे संपूर्ण राज्यभर तसेच राज्याबाहेरही पसरल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.