नाशिक : सराईत गुन्हेगाराच्या 'जेलमुक्ती'साठी प्रेयसीचं भयानक कांड, डॉक्टरकडून पाच लाखांची खंडणी वसूल करून जिवे मारण्याची धमकी
नाशिक : सराईत गुन्हेगाराच्या 'जेलमुक्ती'साठी प्रेयसीचं भयानक कांड, डॉक्टरकडून पाच लाखांची खंडणी वसूल करून जिवे मारण्याची धमकी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात काही महिन्यांपूर्वी बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी याला जामिनावर सोडवण्यासाठी त्याची प्रेयसी मानसी अनामिक वाळके हिने समोरच राहणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर तरुणीकडून तब्बल 4 लाख 97 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पैसे परत मागितल्यावर ‘आम्ही गुंड आहोत, मारून टाकू’ अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कुंदनसह मानसी वाळके यांच्याविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ३० वर्षीय असिस्टंट डॉक्टर असून, ते दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी आहेत. आरोपी मानसी अनामिक वाळके व कुंदन सुरेश परदेशी (दोघेही रा. शतावु करवा बिल्डिंग, माळी मंगल कार्यालय, मखमलाबाद) यांनी संगनमत करून फिर्यादी डॉक्टरकडून 90 हजार रुपये किमतीची 6.15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 90 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले, 45 हजार रुपये किमतीची सव्वातीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 45 हजार रुपये किमतीचे सव्वातीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अशा दागिन्यांसह आरोपींनी 2 लाख 27 हजार 500 रुपयांची रोख रक्कम रोख स्वरूपात व फोन पेद्वारे जबरदस्तीने घेतले.

वाळके व परदेशी यांनी डॉक्टरला ऑक्टोबर 2024 ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेळोवेळी धमकी देऊन सुमारे 4 लाख 97 हजार 580 रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतरही डॉक्टरांना जिवे मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group