नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पहिले लग्न होऊनही दुसर्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर विविध ठिकाणी 4 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी दानिश शेख (वय 31) याचा विवाह झालेला होता. तरीही त्याने पीडित तरुणीशी खोटे बोलून तिला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी जवळीक वाढवली. नंतर त्याने जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत देवळाली कॅम्पमधील खंडोबा टेकडी, त्र्यंबक रोडवरील आनंद रिसॉर्ट, अशोका मार्ग येथील कंपनीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिने दानिश कडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला.
दुसरा आरोपी तौसिफ अख्तर (वय 34) याने पीडित तरुणीला ऑफिसमध्ये लॉबी, पॅन्ट्री येथे तिला पकडून तिच्याशी लैंगिक जवळीक साधण्यासाठी स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी दानिशला अटक केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.