अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने आज पहाटे अटक केली आहे. अशोक खरातने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडीओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत.
सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. अशोक खरातचे पाद्यपूजन करतानाचे रुपाली चाकणकरांचे फोटोही समोर आले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर ?
शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे.