अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरात समाजकंटकांचा हैदोस पहायला मिळाला आहे. गुरुवारी (दि. 12) रात्री अज्ञात समाजकंटकांनी परिसरात दहशत माजवत दोन ते तीन चारचाकी वाहनांची तोडफोड केलीय. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा अंबड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने चार ते पाच अल्पवयीनांसह एकास ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, दगड, विटा तसेच पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या आलिशान चारचाकी वाहनांवर हल्ला चढवून त्यांची तोडफोड केली. त्यानंतर गल्लीबोळात शिरून घरांसमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहने पाडत नागरिकांना शिवीगाळ करत धमकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, जुने सिडको परिसरात वाहन तोडफोडीची ही तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.