कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर मनपाची कारवाई
कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर मनपाची कारवाई
img
दैनिक भ्रमर

सातपूर – प्रभाग क्रमांक ८ मधील कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या चिकन-मटन विक्रेते टपऱ्या, चायनीज व अंडा भुर्जीचे गाडे यांच्यावर मनपा प्रशासनाने कारवाई करत परिसरातील अतिक्रमण हटविले. 
       
कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरात अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे चिकन-मटन विक्रीच्या टपऱ्या तसेच चायनीज व अंडा भुर्जीचे गाडे उभे राहत होते. सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती .काही टवाळखोरांकडून दारू पिऊन आरडा-ओरड, गोंधळ घालण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून मनपा प्रशासनाकडे करण्यात येत होती. यामुळे परिसरातील नागरिक, महिलांना तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री व उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार सातपूर विभागीय कार्यालयाने विशेष मोहीम राबवत अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली.         
 या मोहिमेत सातपूर विभागीय अधिकारी कैलास अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, सुमेश दिवे, प्रमोद आव्हाळे, श्रीराम शिंदे, मेघनाथ तिडके यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.मनपा प्रशासनाने  केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

अन्नपूर्णा भाजीपाला मार्केट हे वास्तविक फक्त भाजीपाला खरेदी करण्यासाठीचे ठिकाण आहे. परंतु या ठिकाणी चिकन,मटण, भंगार दुकाने होऊन अतिक्रमण करण्यात आले व म्हणूनच आज महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली ज्याचे स्वागत नागरिकांकडून होतं आहे. प्रभाग क्रमांक ८ हा नागरिकांना अतिक्रमण मुक्त प्रभाग हवा आहे. चिकन, मटण मार्केट ह्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याची मागणी केलेली आहे, असे नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group