नाशिकमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ‘इन्स्टाग्राम’वर झालेली ओळख नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला भोवली आहे. ‘इन्स्टाग्राम’वर झालेल्या ओळखीत अन पुढे मैत्रीत संशयितांनी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आहे . ही खळबळजनक घटना ४ मार्चला घडली असून याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पीडित मुलगी नाशिकरोड येथील एका हायस्कूलमध्ये नववीत शिक्षण घेते. घटनेच्या दिवशी ती तिच्या वडिलांसोबत घरी होती. मात्र दुकानातून सामान आणण्यासाठी सांगून सकाळी दहा वाजता गेलेली मुलगी लवकर परत न आल्याने वडिलांनी आईला कळविले. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.अखेर मुलीनेच फोन करून दुपारी अडीचला नाशिकरोड बस स्थानकावर आईला बोलावले. बसस्थानकावर ती खूप घाबरलेली होती. घटनेबाबत तिने वाच्यता केली नाही. दोन दिवसांनी पीडितेने तिच्या भावाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याबाबत कळताच कुटुंब हादरले.
पीडित मुलीने कुटुंबाला सांगितले की ,‘इन्स्टाग्राम’वर दोन महिन्यांपूर्वी ओळख झालेला संशयित सुरज उर्फ परशा जाधव याने फोन करून नाशिक रोड बस स्थानकावर भेटायला बोलावले. न आल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. अखेर ती त्यांना भेटायला गेली. तेथे सुरजसोबत दुसरा संशयित जयसिंग वाघ दुचाकीवर आला होता. मुलीला धमकावून तिच्यावर चेहेडीजवळ दारणा नदीकाठावरील जंगलात अत्याचार केला. संशयिताने मोबाइलमध्ये मुलीचे फोटो, व्हिडीओ काढले.नंतर तिला नाशिकरोड बसस्थानकावर सोडून पोबारा केला.
नाशिकरोड पोलिसांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकेशन शोधून दोघांना सुरज उर्फ परशा जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि जयसिंग रमेश वाघ (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) यांना वांबोरी गावातून रविवारी बेड्या ठोकल्या. दोन्ही संशयित मजुरी करतात. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.