नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्रिकूटाने पाच जणांची 53 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी महिला यांचा मुलगा हा सन 2023 मध्ये सरकार नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे पवन पवार यांना सतिश वानखेडेमार्फत सरकारी नोकरी लागणार असल्याचे सांगितले. ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादी यांच्या पतीचे पवन पवार यांनी सतिश वानखेडेसमवेत सरकारी नोकरी लावण्याबाबत फोनवर बोलणे करुन दिले. तेव्हा सतिश वानखेडेने पालघर येथे विधी व न्याय विभागात सरकारी नोकरी असल्याचे त्यांना सांगून पवन पवार यास पुढील आठ दिवसांत नोकरी लागणार असून, तुमचे देखील काम 15 दिवसांत मार्गी लावून देतो, असे आश्वासन दिले.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती सतिश वानखेडेला बिटको चौकात एका हॉटेलजवळ भेटले असता नोकरी लावून देण्यासाठी 20 लाख रुपये लागतील व त्यापैकी 5 लाख रुपये लगेच लागतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन सतिश वानखेडेला 5 लाख रुपये ट्रान्स्फर केले. वानखेडेने फिर्यादी यांच्या मुलाचे मेडिकल पुण्याच्या ससून हॉस्पिटल येथे करण्यास सांगितले. मुलाचे जॉईनिंग लेटर येणार आहे. त्यासाठी उर्वरित 15 लाख रुपये त्वरीत द्यावे लागतील, असे सांगितल्याने फिर्यादी यांनी पतीच्या बँक अकाऊंटवरुन सतिश वानखेडेला बँकांतील विविध खात्यातून पैसे ट्रान्स्फर केले.
दरम्यान सतीश वानखेडेचे वडील संजय वानखेडे यांनी फिर्यादी यांना आपण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून, सतीश मुलांना सरकारी नोकरी लावून देण्याचे काम करतो असे सांगत वेगवेगळे जॉईनिंग लेटर दाखविले. त्या दरम्यानच्या काळात सतीश वानखेडे याने पवन पवार यांच्याकडून 20 लाख 50 हजार, योगेश कापडणीस यांच्याकडून 5 लाख, धनंजय वाघ यांच्याकडून 5 लाख व प्रशांत पगार यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले. त्या बदल्यात त्याने जॉईनिंग लेटर दिले.
आदिवासी विभागात हे जॉईनिंग लेटर घेऊन फिर्यादी यांचा मुलगा गेला असता ते लेटर बनावट असल्याचे समजले. त्याच्यावरील सह्यादेखील खोट्या असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी वानखेडेला फोन केला असता त्याचा फोन नेहमी बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी सतीश वानखेडे, संजय वानखेडे व प्रशांत वानखेडे (रा. तपोवन रोड, समर्थनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.
हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान घडला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.