नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - आयटी कंपनीमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेख याला नाशिकरोडच्या कारागृहात मारहाण झाल्याची माहिती त्याने स्वतः न्यायालयात दिली. या प्रकरणात न्यायालयाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तरी देखील एसआयटीने दुसर्या प्रकरणांमध्ये मागितलेल्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वरिष्ठ कर्मचार्यांकडून हिंदू महिला, मुली आणि मुलांना धर्मांतर करण्याबरोबरच लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणावर आतापर्यंत नाशिक पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. यातील प्रमुख म्हणून समोर आलेली एचआर निदा खान अद्यापही फरार आहे. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपी शफी शेख व त्याचा दुसरा सहकारी मेमन यांना दुसर्या एका गुन्ह्याच्या तपासात पोलीस कोठडी मिळण्यासाठी काल नाशिक न्यायालयात हजर केले असता आरोपी शफी शेख याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांकडून त्याला मारहाण झाल्याची माहिती न्यायालयात दिली. इतर कैद्यांनी का मारहाण केली याचे कारण मात्र त्याने सांगितले नाही. यावर जिल्हा सत्र न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत.