नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रस्त्यामध्ये असलेली विहीर आणि रस्ता कसा झाला, या सर्व कामांची नगररचना विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
दिंडोरी येथे विहिरीमध्ये कार कोसळून नऊ जणांचा काल रात्री मृत्यू झाला. यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंत्री नरहरी झिरवाळ कुंभमेळा आणि आपत्ती मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. झालेला प्रकार हा दुर्दैवी असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले असून ते म्हणाले की, यापूर्वी हा प्रकार कसा लक्षात आला नाही यावर नगरपंचायतीने आता लक्ष घालण्याची गरज आहे.
दरम्यान या ठिकाणी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नगरपंचायतीने हा रस्ता कशा पद्धतीने केला, रस्त्यात विहीर होती तर त्याची काळजी का घेतली गेली नाही, या सर्व प्रकरणाची आता राज्य शासनाच्या नगररचना विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आले असून राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना होऊ नये म्हणून नियोजनही केले जाणार आहे.