नाशिक शहरात खरात पार्ट 2 ! ऑफिस बॉयने मालकाला अडकवलं; 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने खळबळ
नाशिक शहरात खरात पार्ट 2 ! ऑफिस बॉयने मालकाला अडकवलं; 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने खळबळ
img
वैष्णवी सांगळे
सातपूर (भ्रमर प्रतिनिधी):- सातपूरमधील खंडणी प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, ज्येष्ठ नागरिक असलेला फिर्यादीच मोठ्या सेक्स स्कँडलमध्ये अडकला आहे. खंडणीखोरांविरोधात तक्रार करणार्‍या ६३ वर्षीय रवींद्र एरंडे विरूद्ध एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषण, आयटी अ‍ॅक्ट तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एरंडेला अटक केली असून या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दि. २ एप्रिल रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल खंडणी प्रकरणात आधीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. त्यांची तपासणी करताना तब्बल १२१ अश्लिल व्हिडिओ क्लिप्स सापडल्याने पोलिसही चक्रावले. या सर्व व्हिडिओंमध्ये खंडणी प्रकरणातील फिर्यादी विविध महिलांसोबत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा एका पीडित महिलेने सातपूर पोलिसांशी संपर्क साधत गंभीर आरोप केले. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित रविंद्र एरंडे (वय ६३, रा.नीळकंठेश्वर नगर, अशोकनगर, सातपूर) याने तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचे भविष्य उज्ज्वल करतो असे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. तसेच ती अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनही त्याचा गैरफायदा घेत, नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी रविंद्र एरंडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७७, आयटी अ‍ॅक्ट कलम ६७ (अ) तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी करीत आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी एरंडे याने अनेक महिलांसोबत शारिरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हिडिओ शूट केल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून मोठे सेक्स रॅकेट किंवा स्कँडल उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरोपीविरोधात कोणतीही तक्रार असल्यास ती सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवावी. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group