त्र्यंबकेश्वर येथून मोठी बातमी समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर येथे मंदिरापासून जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला आहे. शुकवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर एक वाहनाने पेट घेतला. त्यामधील प्रवासी बाहेर पडले तोपर्यंत वाहनाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते.
कारने पेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी बाजूला उभ्या असलेल्या दुसर्या वाहनाने पेट घेतला. त्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तेथे बोलावले. मात्र, तोपर्यंत दोन वाहने जळून खाक झाली होती. दरम्यान, वाहनांच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला असता तर जवळच असलेले उपजिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर मंदिरात 200 रुपये पेड दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविकांना देखील हानी पोहचली असती.
या परिसरात असलेली अवैध पार्कीग बंद करावी म्हणून नागरिक सातत्याने मागणी करत असतात. मात्र, त्याकडे पोलीस अथवा नगर परिषद गांभीर्याने लक्ष देत नाहीत. अशा प्रकारची आपत्तीजन्य घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे.