नाशिक : दारू पिताना हटकल्याने डॉक्टरच्या घरावर दगडफेक
नाशिक : दारू पिताना हटकल्याने डॉक्टरच्या घरावर दगडफेक
img
दैनिक भ्रमर
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- दारू पिताना हटकल्याचा राग आल्याने दोघांनी डॉक्टरच्या घरावर दगडफेक करून कोयता फेकून मारल्याची घटना जेलरोड परिसरात घडली.



याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. नीलय कृष्णा तोरसकर (वय 39, रा. श्रीरंग सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) हे काल (दि. 19) दुपारी घरी होते. घराबाहेर दगडांचा आवाज येऊ लागल्याने त्यांनी बाहेर डोकावले असता तेथे करण दत्ता साळवे व त्याचा मित्र हे दोघे दारू पीत होते. “येथे दारू पिऊ नका,” असे डॉ. तोरसकर यांनी त्यांना सांगताच त्यांना दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने डॉक्टरांच्या घरावर दगड फेकला. करण साळवेच्या हातात असलेला कोयता त्याने डॉक्टरांवर फेकून मारला. तो कोयता घराच्या खिडकीला लागल्याने सुदैवाने यात डॉक्टर बचावले. या हल्ल्यात खिडकीच्या काचा फुटल्याने या काचा डॉक्टरांच्या हाताला लागल्या. काही वेळाने डॉक्टरांच्या मित्राने त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात नेले. 

या प्रकरणी दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल कोरपड करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group