दिल्लीच्या कालकाजी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालकाजी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा फाशीवर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आई आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या सामूहिक हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
कालकाजीतील जी - ७० बी येथील एका घरात ही घटना घडली आहे. घटनेच्या दिवशी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह कोर्ट बेलीफ घरात आले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. त्यांचा हेतू कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि घराचा ताबा घेणे हा होता. त्यांनी वारंवार दार ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने घराचे दार उघडले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना एका सुसाईड नोट देखील सापडली आहे. मानसिक ताण आर्थिक अडचणींमुळे तिघांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे कुटुंब दीर्घकाळापासून मानसिक ताण आणि नैराश्याने ग्रस्त असल्याची माहिती मिळतआहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
सध्या पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. तसेच तपासानंतर नेमकं प्रकरण काय? हे उघड होईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.