सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा बसलाय. पण तरीही नागरिक सावधान काही होत नाही. गोरेगाव येथील 50 वर्षीय उद्योजकाला देखील याचा अनुभव आला आहे. ज्यामुळे त्याला आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करावं लागलं आहे. आणि याला कारण फक्त एका व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल ठरला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
गोरेगाव येथील ५० वर्षीय उद्योजका जो की केमिकल उत्पादक आहे त्याने फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री केली. २५ नोव्हेंबरला त्याला रिक्वेस्ट आली होती. तिच्या प्रोफाइलमध्ये बँक कर्मचारी असल्याचा उल्लेख होता. दुसऱ्याच दिवशी महिलेने आपली ओळख सांगत संभाषणाला सुरुवात केली.
आणि याच दरम्यान दोघांनी एकमेंकाना आपला मोबाईल नंबर देखील दिला.
२८ नोव्हेंबरला रात्री १० च्या सुमारास महिलेने आपले फोटो या उद्योजकाला पाठवले. उद्योजक व्यस्त असल्याने त्याचं लक्ष त्याकडे गेलं नाही. नंतर त्याला अनेक मेसेज आणि व्हिडीओ कॉल आल्याचं दिसलं. यानंतर त्याने अखेर एक व्हिडीओ कॉल स्विकारला. धक्कादायक म्हणजे व्हिडीओ कॉलमध्ये महिला आपले कपडे काढू लागल्याने त्याला धक्काच बसला. यामुळे घाबरलेल्या उद्योजकाने तात्काळ कॉल कट केला.
पण व्हिडीओ कॉल स्विकारुनच त्याने मोठी चूक केली होती, कारण हाच त्यांचा मोडस ऑपरेंडीचा भाग होता. महिलेने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 1.20 लाख रुपये उकळले. काही दिवसांनी महिलेने त्याला एक व्हिडीओ पाठवला. तिने दोघांच्या कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केलं होतं. ही क्लिप पाठवून तिने धमकावण्यास सुरुवात केली.
जर मला 50 हजार रुपये दिले नाही तर हा व्हिडीओ पत्नी आणि नातेवाईकांना पाठवेन अशी धमकी तिने दिली.यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करुन ब्लॅकमेल करणं सुरु झालं. पुन्हा एका महिलेने आपण दिल्लीतील पोलीस अधिकारी आहोत अशी बतावणी करत पैशांची मागणी केली. हे उघड झालं तर आपला अपमान होईल अशी लाज वाटत असल्याने उद्योजकाने पैसे पाठवले.
पण पुढच्या काही आठवड्यांमध्ये त्याच्याकडून 1.20 लाख उकळण्यात आले. अखेर उद्योजकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेनंतर तरी लोक सोशल मीडियावर जपून राहतील का प्रश्नच.