देशात सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार सुरू आहे. नव्या दमाचे खेळाडू आपला करिश्मा दाखवत आहेत. पण या स्पर्धेला मॅच फिक्सिंगचे गालबोट लागले आहेत. देशांतर्गत क्रिकेटवर मॅच फिक्सिंगचा धोका पुन्हा एकदा ओढावल्याचे समोर आले आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव सनातन दास यांनी याबाबत माहिती दिली. सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या लीग टप्प्यात क्रिकेटशी संबंधित मॅच फिक्सिंग झाली. यामध्ये आसामचे चार खेळाडू दोषी आढलले आहेत.
आसाम संघातील अमित सिन्हा, इशान अहमद, अभिषेक ठाकुरी आणि अमन त्रिपाठी या चार खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचे पुरावे मिळाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या चार खेळाडूंचे निलंबन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून त्या चारही खेळाडूंविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान लखनौ येथे झालेल्या सामन्यावेळी मॅच फिक्सिंग झाल्याचं समोर आले आहे. त्यांनी आसाम संघातील काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. याबाबत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिट (एसीएसयू) ने चौकशी केली. एसीएने या चार खेळाडूंविरोधात कारवाई केली असून गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल केला आहे, असे दास यांनी सांगितले.
निलंबित करण्यात आलेले खेळाडू सय्यद मुश्ताक अली चषकात आसाम संघाचा भाग नव्हते. पण त्या खेळाडूंनी मॅच फिक्सिंगच्या उद्देशाने संघातील खेळाडूंसोबत संपर्क केला होता. आसामचा कर्णधार रियान पराग याच्यासोबत त्यांनी संपर्क केलेला होता. रियान परागने याबाबत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिटला याची तक्रार दिली होती, अशी माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे अभिषेक ठाकुरी. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होण्याच्या काही दिवस आधीच तो रणजी ट्रॉफीत असमकडून खेळत होता. त्याने सर्व्हिसेस आणि त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या मालिकेत त्याच्या तीन डावांमध्ये अनुक्रमे 9, 20 आणि 20 धावा झाल्या होत्या. मात्र, या रणजी सामन्यांतील त्याची कामगिरीही तपासाच्या कक्षेत आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील हंगामातही ठाकुरीने विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. तर अमित सिन्हा 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सामने खेळला होता.