भारतीय स्टार क्रिकेटपटू तिलक वर्मा यांच्याबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिलक वर्माला अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे कोणताही विलंब न करता त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसह आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टी-२० प्रकारात खेळवण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेतील हिरो आणि मध्यफळीतील भारतीय संघाचा हुकमी एक्का तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली. पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या टेस्टिक्युलर टॉर्शनचं निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने युवा क्रिकेटरवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला तिलक वर्माची प्रकृती स्थिर आहे, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेला तो मुकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो रिकव्हर होणार का? हा देखील एक मोठा प्रश्नच आहे.
तिलक सध्या राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळत होता. बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर त्याला अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मधील डॉक्टरांशी सल्लामसलत केली. बीसीसीआयच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले, “तिलकला आज सकाळी पोटात प्रचंड वेदना झाल्या. त्याला तातडीने राजकोटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे विविध तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल COE च्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आहेत.”
सूत्रानुसार, डॉक्टरांनी तिलकला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, त्यातून पूर्णपणे सावरण्यास तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची संपूर्ण टी20 मालिका खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. बीसीसीआयची खरी चिंता मात्र 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी तिलकची उपलब्धता आहे. भारताचा पहिला सामना त्याच दिवशी अमेरिकेविरुद्ध होणार आहे.