वर्ल्डकपच्या सेमिफायनलआधी टीम इंडियाला मोठा हादरा बसला आहे. दुखापतीमुळे स्टार फलंदाज संघाबाहेर झाली आहे. न्यूझीलंड संघाला पराभूत करून आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपचं जेतेपद पटकावण्यापासून टीम इंडिया फक्त दोन सामने दूर आहे.

सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षा उंचावल्या असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करून सेमिफायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर सेमिफायनलच्या आधी बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील एक सामना होता. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पण या सामन्यात भारताची सलामीवीर प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली.
या सामन्यात प्रतिका रावल ही बाउंड्रीजवळ फिल्डिंग करत होती. त्यावेळी तिला दुखापत झाली आणि ती मैदानाबाहेर गेली. प्रतिका पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिका संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाहेर झाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अत्यंत महत्वाच्या सेमिफायनलच्या सामन्याआधीच प्रतिका स्पर्धेबाहेर गेल्यानं टीम इंडियाला हा मोठा हादरा मानला जात आहे.