नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी सामन्यादरम्यान आपल्या हातावर काळी पट्टी बांधली.
राष्ट्रगीतादरम्यान दोन्ही संघांचे सर्व खेळाडू व पंचही हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेले दिसले. पण यामागचं कारणही तितकंच धक्का देणारं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २९ ऑक्टोबरला एका १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटूला जीवघेणी दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. १७ वर्षीय ऑस्टिनचा सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्याला श्रद्धांजली म्हणून ही पट्टी बांधण्यात आली आहे.
बेन ऑस्टिन मंगळवारी आपल्या क्लबच्या नेट्समध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनसमोर फलंदाजीचा सराव करत होता. त्याने हेल्मेट घातलेले असले तरी चेंडू त्याच्या मानेजवळ लागला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही संघांनी काळी पट्टी बांधून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय महिला संघाची प्लेइंग-11 : शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर.
ऑस्ट्रेलिया महिला संघाची प्लेइंग-11 : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.