भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा संघ आता फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉसनंतर भारताच्या प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली.
भारताची प्लेईंग ११ :
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशूल कंबोज.
इंग्लंडची प्लेइंग ११ :
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ, लियम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारताने सलग चौथ्यांदा टॉस गमावला आहे. कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलला आतापर्यंत एकही नाणेफेक जिंकता आलेले नाही. इंग्लंडने सोमवारी (२१ जुलै) त्यांच्या ११ शिलेदारांची घोषणा केली होती. आज टॉस झाल्यानंतर भारताने त्याच्या ११ शिलेदारांची माहिती दिली. भारतीय संघात बरेचसे बदल करण्यात आले आहेत.
करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला तिसऱ्या स्थानावर खेळवण्यात येणार आहे. करुणला संधी देऊनही तो तिसऱ्या क्रमांकावर धावा करण्यात अयशस्वी ठरल्याने मँचेस्टर कसोटीत साई सुदर्शनला संधी देण्यात आली.
नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप आणि अर्शदीप सिंह हे सामन्यातून बाहेर पडले आहेत. नितीशच्या जागी शार्दूल ठाकूरला प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज अंशूल कंबोजने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आलीये.