आयसीसी अंडर १९ मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेची प्रतीक्षा आता संपली आहे. आयसीसीकडून वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धा २०२६ मध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.
वनडे फॉर्मेटमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा १५ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर ६ फेब्रुवारीला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ असून चार गटात विभागणी केली आहे. यात सर्वाधिक पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या भारतीय संघाला अ गटात ठेवलं आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोत होईल.
महत्त्वाचे म्हणजे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार नाही. कारण आयसीसीने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेलं हे द्वंद्व काही अंशी शमवल्याचं दिसत आहे.
आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही गटांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे साखळी फेरीत या दोन्ही संघांची भिडत काही होणार नाही. फार फार तर बाद फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात.
चार गटात विभागणी
गट अ मध्ये भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.
गट ब मध्ये सह-यजमान झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड आहेत.
गट क मध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया , आयर्लंड, जपान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.
गट ड मध्ये टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.