वेस्ट इंडिजचा कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यादरम्यान एका बातमीने मोठी खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटपटूवर ११ महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्डाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप झालेल्या क्रिकेटपटूचे नाव अद्याप उघड झालेले नसले तरी, तो सध्याच्या संघाचा भाग आहे अशी माहिती समोर आली आहे.
स्पोर्ट्स मॅक्स चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडियन क्रिकेट संघाचा भाग असलेल्या गुयानाच्या स्थानिक खेळाडूवर झालेल्या आरोपांबद्दल वेस्ट इंडियन बोर्डाला प्रश्न विचारण्यात आले.
बोर्डाला या प्रकरणाची माहिती आहे का? जर माहिती असेल, तर बोर्डाने कोणती कारवाई केली? असे काही प्रश्न विचारण्यात आले होते.
वेस्ट इंडियन बोर्डाचे अध्यक्ष किशोर शॅलो यांनी विचारलेल्या प्रश्नांवर 'सध्या बोर्डाकडे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करु शकत नाही', असे उत्तर दिले.
तेथील एका स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , वेस्ट इंडिज संघातील खेळाडूवर ११ महिलांनी बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सध्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना सध्या सुरु आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये रंगला आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ विकेट गमावल्यानंतर ९२ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ १९० धावांवर ऑलआउट झाला होता. त्यांनी फक्त १० धावांची आघाडी घेतली होती.